सोड्याची खिचडी

श्रावण येण्यापुर्वी एक खास सी के पी पाककृती.
साहित्य-
४ वाट्या तांदुळ, १ वाटी सोडे, २ चमचे हळद, ४ चमचे तिखट, मीठ, तेल, हींग, लिम्बु/ चिन्चेचा कोळ, २ बारीक चिरलेले कांदे,गरम मसाला, आले-लसुन पेस्ट ,लवंग्,दालचीनी, गरम पाणी, कोथिंबीर्,खवलेले खोबरे

कृती-
करण्यापुर्वी १/२ तास तान्दुळ धुवुन ठेवावेत व सोडे भिजत घालावेत.

सोड्यांचे जरा छोटे तुकडे करुन घ्यावेत. त्यांना हळद, तिखट, मीठ, आले-लसुण पेस्ट, गरम मसाला ,मीठ लावुन लिंबु पिळुन वा चिन्चेचा कोळ घालुन १० मिनीटे ठेवावे.
एका तव्यात तेल तापवुन त्यात हिन्ग व थोडा कांदा परतुन घ्यावा. त्यात मसाला लावुन ठेवलेले सोडे नीट परतुन घ्यावेत.
दुसर्‍या भांड्यात तेल तापवुन त्यात लवंग्,दालचीनी,हळद,तिखट,गरम मसाला ,मीठ टाकुन त्यात उरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा. त्यावर तांदुळ टाकुन ते ही परतुन घ्यावेत. २/३ मिनीटांनी त्यावर तव्यातील सोडे टाकावेत व मिश्रण ही नीट परतावे. मग त्यात ६ वाट्या पाणी घालुन भात नीट शिजु द्यावा.
भात मोकळा शिजुन वाफ आली की त्यावर कोथिंबीर्,खवलेले खोबरे टाकावे.
गरमागरम सोड्याची खिचडी तय्यार.