श्रावण

श्रावण संपत आला की आमच्यासारख्यांना वेध लागतात ..श्रावण सुटण्याचे. माझ्या मुलांना तर श्रावण अाला हे बागुलबुवा आला सारखं वाटत असावं. गेली एक दोन वर्ष मी म्हणते श्रावण नाही पाळायचा पण मग वाटतं जाऊ दे एक महिना पाळू बाकी वर्षभर खातोच की नॉन व्हेज . मुलांना मासेमारी बंद , माशांचा विणीचा हंगाम , सण ही कारणं पुन्हा एकदा सांगते.मुलं पण उत्साहाने होकार भरतात. 4-8 दिवस ठिक वाटतं . तरी एकदा तर छोट्याने नागपंचमीलाच विचारलं – आला का संपत श्रावण ??
मग भाज्या रिपीट होतात कारण आवडीचा प्रश्न येतो . सगळ्यात कठीण रविवार . मटण, चिकन, मासे यांना पर्याय उभं करणं सर्वात कठीण काम . भाताचे विविध प्रकार , पावभाजी ,इडली, डोसे काहीही केलं तरी ‘त्याची’ सर कशाला येत नाही . कोळीण हाक मारते” अगं ये, केवरी कोलंबी हाय बग.. ये, सस्ती देते .. वाटा बग ..मोठा हाय .. लावते अजून.., ये…” तिथली नजर वळवून दुधी, पडवळ यांची खरेदी करताना किती त्रास होतो ते खाणाराच जाणे. बिचारी भाजीवाली , ती पण दया येऊन म्हणते” जाऊदे , काय करताव ताई, खा थोडे दिस भाजी. आला न्हवं संपत शरावण..”
तरी गोडधोड असतं म्हणून महिना पुढे सरकत राहतो . पंधरा दिवसांनी काउंटडाऊन सुरु होतो . कधी खायचं तो दिवस अगदी सुवर्णाक्षरात लिहायचा बाकी असतो. श्रावण संपून गणपती यायच्या आधी खाणारे काही असतात तर काही घरचा गणपती विसर्जन केल्यावर खाणारे . पण कधीच खायचं हा दिवस प्रत्येकाने पाहिला असतो. माझ्या मुलाने लहानपणी कालनिर्णय वर त्या दिवशी छोटं चित्र काढलं होतं माशाचं आणि वर कारण सांगितलं की चतुर्थी ला नाही का मोदक दाखवत इथे , तसं . खायला हवं नं त्यादिवशी …
एकदाचा तो दिवस उजाडतो . सगळ्यांना अगदी उत्साह येतो . नवरा पिशवी घेऊन बाजारात अगदी आनंदाने जातो . चार पाच मत्स्यप्रकार घरी अवतरतात. तळण्याचे, फोडणीला टाकण्याचे आवाज आणि वास आले की किचनमधे सगळ्यांच्या फेर्या वाढतात. झालं का चा धोशा सुरु होतो . शेवटी तो क्षण येतो आणि दशावतारातील पहिला अवतार जिभेवर राज्य करू लागतो. थोडावेळ हातातोंडाची लढाई होते . बोलणं पण सुचत नाही कुणाला आणि मग उरतात रिकाम्या ताटात काटे आणि भरलेली पोटे. मग येणारी दुपारची झोप काय वर्णावी.. खुद्द पु ल पण त्याला स्वर्गसुखाहून भारी म्हणतात . ..
मुलं म्हणतात पुढच्या वर्षी पण पाळू हं श्रावण .. मजा येते … माझ्या मिटू पाहणार्या डोळ्यासमोर पुन्हा सरता महिना चमकतो आणि बघू असं म्हणून मी निद्राधीन होते ..

पद्मश्री चित्रे

एक दिवस पावसाचा

कालच्या पावसात मी आॅफीस मधे अडकले चर्चगेटला आणि माझे मिस्टर सी एस टी ला. घरी धाकटा 13 वर्षांचा मुलगा एकटा. घराबाहेर कंबरभर पाणी आणि लाईट पण नाहीत.
जसजसा पाऊस वाढत होता तशी काळजी पण . नातेवाईक , बहिणी, मित्र मैत्रिणी यांचे फोन वाढत होते . मुलाची तिथेच व्यवस्था झाली . पण तोवर मुलाचे मित्र , त्यांच्या आई यांचे इतके फोन आले की मी सांगून पण दमले. मग मला whatsapp, मेसेंजर वर निरोप यायला लागले . ओळख नसतानाही कुणी आपली इतकी काळजी घेत आहे हे खरंच खुप छान feeling होतं . मुंबई बाहेर असणारेही नातेवाईक , संस्था यांची माहीती सांगत होते . . अगदी काळजीने विचारलेला जेवण झालं का , खरं तर जेवण मिळालं का हा प्रश्न पण चांगलाच वाटत होता . ही extended family आहे असं वाटत होतं . शाळेतल्या whatsapp group ने तर हसत खेळत जरा टेन्शन कमी केलं . त्यातील बहुतेकांनी प्रत्यक्ष संवाद साधला. एकटं वाटू दिलं नाही. ऑफिस तर होतंच – योगक्षेमं वहाम्यहम
हे ब्रीद सार्थ करत .
आज घरी येईपर्यंत सगळ्यांनी काळजी घेतली .. सगळ्यांचे आभार .असंच प्रेम राहू दे, हीच प्रार्थना .

 

पाऊसराजा

ऐका पाऊसराजा तुमची कहाणी . आटपाट नगर होतं . तिथे एक स्त्री आपला पती , मुले व सासू सासरे यां सोबत रहात होती . रोज सकाळी लौकर उठून मुलांचे व सर्वांचे डबे करून , पथ्याचे बिन पथ्याचे स्वयंपाक करुन , शाळेची तयारी , मधल्या वेळच्या खाण्याची तयारी करून धावत पळत लोकल पकडून कामाला जाई. संध्याकाळी परतताना सामान सुमान भाजीपाला आणून थकून भागून घरी येई. पावसाळ्यात तर या हालात अजून भर पडे. एके दिवशी तिच्या दारी एक साधू आला . म्हणाला ” बाई , थकलेली दिसतेस” ती म्हणाली ” होय महाराज . काही उपाय सांगा”

साधू म्हणाला ” एक व्रत आहे . करशील? उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको .”

ती म्हणाली ” उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही . काय करावं या साठी?”

साधू म्हणाला ” पावसाळ्यातील एक दिवस निवडावा जेंव्हा खूप पावसाची भाकिते टि व्ही , व्हॅाटस अॅप सगळीकडे सांगत असतील . पाऊस भरलेला असेल आणि थोडा का होईना पडत असेल .अशा वेळी काय करावं? आरामात उठावं आणि टिव्ही च्या बातम्या बघून म्हणावं ” काय पाऊस !! गाड्या बंद होतील . जाऊन अडकायला नको.” पंधरा दिवसांपूर्वी रात्रभर आॅफीसमधे अडकावं लागलं त्याचं , 26 जुलै चं घरादाराला स्मरण करून द्यावं . दोन चार मैत्रिणींना फोन करुन, मेसेज करून आपल्या विचारांचं वाण द्यावं आणि त्यांना पण घरीच बसवावं. गरमागरम चहा पित पेपर वाचत पाऊस बघावा . त्याने काय होतं तर आपला निर्णय बरोबर अशी समजूत घालता येते . सगळ्यांना घरात ठेवण्याचा यत्न करावा, मनोभावे सांगावे . काही गरमागरम चविष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आदल्या रात्री फ्रीजर मधे ठेवलेली पापलेट, सुरमई, कोलंबी बाहेर काढून पदर खोचून रांधावे. मधे मधे बाहेर पाहून ” अग्गो बाई ! बरं झालं गेले नाही !” असे उद्गार काढावेत. सगळ्यांना भरपूर जेवायला घालावं. त्याने काय होतं .. पुढच्या चार पाच तासांची निश्चिंती होते . आपणही भरपेट जेवून , पडदे आेढून काळोख करावा . मोबाईल वर मैत्रिणींशी गप्पा हाणाव्या,काय बाई पाऊस हा जप अधेमधे करत रहावा. फेसबुकवर धा-बारा कमेंटी माराव्या, पंधरा वीस अंगठे व पाच सात बदाम पाठवावेत. विनाकारण इनबॉक्स मधे डोकावणार्या एक दोघांना जरा सुनवावंं. लायनीतील दोन चार रिक्वेष्टी अॅक्सेप्ट कराव्यात. त्यानं काय होतं तर आपल्याच बरं वाटतं आणि खुशीत दणकून झोप लागते.

आरामात उठावं आणि पुन्हा चहाचा कप हातात घेउन वाढलेला पाऊस बघावा. पाणी साचलं का ,गाड्या सुरु आहेत का, हवामान खातं काय म्हणतंय यावर वेळोवेळी सगळीकडे बोलत रहावं. निघ लौकर असं आॅफीसमधे असलेल्यांना सांगत रहावं. त्यानं काय होतं , तर ते पण लौकर निघतात व आपली काळजी कमी होते .

यात कामवाल्यांनी दांडी मारली असतेच , मग त्यांची पण भूमिका करावी आणि हुश्श करत पुन्हा एखादे छानसं पुस्तक घेउन समाधी लावावी . नंतर दमले गं बाई म्हणून साधंसंच जेवण करावं किंवा सरळ हॉटेल ला फोन लावावा.त्यानं काय होतं , तर आपल्याला आराम मिळतो नि हॉटेलवाल्याला पैसे .पुन्हा पावसाची खबरबात घेउन ,त्यावर सगळ्या ग्रुपवर जोरदार चर्चा करावी. जोक पुढे सरकवावेत,बी एम सी ला नावं ठेवावीत आणि दुसऱ्या दिवसाची तयारी करत दिवसाचा शेवट करावा.

या व्रताने काय होतं तर दरवर्षी किमान एकतरी दांडी अशी मारता येते आणि घरात बसून पाऊस अनुभवता येतो .

असंच काहीसं व्रत मी आज केलं आणि एन्जॉय केलं . तुम्ही पण हे व्रत करा आणि गंमत अनुभवा एक दिवस, मग ही साठा उत्तरांची कहाणी सुफळ संपूर्ण .

पद्मश्री चित्रे

 

काळाचे पंख

आमचा मोठा लेक अमेय ,अाय आय टी इंदौर ला गेलाय या वर्षीच.दिवाळीपुरता आला होता आणि काल गेला पण . काही वर्षांपूर्वी फटाके , नवे कपडे एवढ्या पुरती असणारी खरेदी यंदा लॅपटॉप , स्पीकर, पॉवर बँक , हेड फोन अशी इ- दिवाळी खरेदी झाली . घरी फराळाकडे न बघणारा मुलगा भरपूर चिवडा , चकल्या सोबत घेउन गेला आहे .मत्स्यप्रेमी मुलाला तिथे मासे बघायला ही न मिळाल्यामुळे इथे यथेच्छ ताव मारला.. अगदी निघेपर्यंत . सोबत नेता आलं असतं तर तेही नेलं असतं त्याने. नेण्याच्या छोट्या मोठ्या सामानाची मोठी यादी करुन आणली होती आणि घेऊन पण गेला. अगदी मोठा झाल्यासारखा …
मुलं कशी बघता बघता मोठी होतात ना!!
‎” अग्गं… , असं काहीतरी त्या दुकानदाराला विचारू नको, हसेल तुला तो..” किंवा ” हे माहीत नाही तुला ??? कम्माल करतेस आई तू पण..” अशी वाक्यं वरचे वर ऐकू येऊ लागली की समजायचं मुलं मोठी व्हायला लागली .. लहानपणी वाजणारे बूट घालून, बोट धरून चालणारा मुलगा म्हणतो” चल, तुला सरकत्या जिन्यावरून कसं धावत चढायचं ते शिकवतो” तेव्हा तर मला फारच गंमत वाटली होती . माझ्यापेक्षा आत्ताच उंच झालेल्या मुलांकडे पाहताना असं खूप काय काय आठवतं.
खरं तर लेक दोन महिन्यांनी परत येईल काही दिवस , त्याला आवडलं आहे तिथे , सोयी पण आहेत तरीही मला खूप उदास वाटतं . तरी बरं धाकटा लेक आहे इथे सोबत . नाहीतर अगदीच घर खायला आलं असतं.मला उगाचच पुढचं चित्र दिसायला लागलं . ही पिल्लं अशीच काही वर्षांनी दूर गावी किंवा दूर देशी झेप घेतील तेव्हा कसं वाटेल .. आजूबाजूला कित्येक घरं बघतो आपण जिथे मुलं बाहेरगावी कायमची गेली आहेत आणि म्हातारे आई बाप इथे त्यांची , त्यांच्या फोन ची , भेटीची वाट पाहत आहेत .. आपलं पण तसंच होईल का.. मुलांच्या सुखाचा, यशाचा अभिमान असतो पण त्यांची उणीव पण जाणवेलच ना? संध्याछाया भिवविती ह्रदया…असं होतं .
लहानपणी किशोर मासिकात एक जाहिरात असायची , मला वाटतं बँक ऑफ महाराष्ट्र ची. बचतीचा संदेश देणारी . त्यात दोन शाळ�करी मुले हातात ऑफिस बॅग घेऊन उभी असतात आणि वर लिहिलं असायचं ‘ काळाला पंख असतात.’
तेव्हा त्याचा अर्थ समजायचा नाही. आता समजतोय .. हो , असतात .. काळाला पंख असतात ..

पद्मश्री चित्रे

Image may contain: 2 people, people standing
Image may contain: 1 person, standing and shoes