व्हेंटीलेटर

व्हेंटीलेटर सिनेमा पाहिला . नुकतंच या सर्व अनुभवातून गेल्यामुळे असेल कदाचित , खूप relate होतं गेलं .त्यातील  विनोदापेक्षा  मुख्य कथानकातच मी गुंतले.
दादांचे ICU तील शेवटचे 23 दिवस,  कधी थोडी सुधारणा तर कधी तब्येत खालावणे, नातेवाईकांची ये जा, काळजी …. तसंच काहीसं.
व्हेंटीलेटर लावायचा की नाही , आधीच नळ्या , सुया खुपसून जीर्ण शरीराला किती यातना द्यायच्या , नव्वदीतल्या देहाने अजून किती सहन करायचं हे आपण ठरवणं किती कठीण असतं ते ही आपल्या वडीलांच्या बाबतीत ..
जसं डॉक्टर श्रॉफ सांगतात तसं माझ्या डॉक्टर भावाने आम्हाला वास्तवाची जाणीव करुन दिली . जगवणं म्हणजे केवळ मरण  त्यांना यातना देत लांबवणं असेल हे सांगितलं . अर्थात तोवर व्हेंटीलेटर लावला नव्हता फक्त तशीच वेळ आली तर काय हा प्रश्न होता . तेव्हा जी घालमेल होते , जे काही वाटतं ते सांगू शकत नाही . अशी वेळ कोणावर न येवो.
पण खरंच ते खूप थकले होते . जायच्या  आदल्या दिवसापासून खुणेने हे सर्व काढा .. आता बास …
असं सांगत होते . एकेक श्वास जाणवत होता. अद्ययावत तंत्राने शरीर तगवलं जात होतं पण जगण्या-मरणाच्या अंधुक रेषेवर झगडणारे आपले कुणी पाहणे वेदना  दायक असतं  . आपण हतबल असतो नियतीसमोर आणि ती जाणीव खिन्न करत राहते .
तब्बल 23 दिवसांच्या ICU तील प्रयत्नांना यश न येता त्यांनी निरोप घेतला . मॉनिटर वरील रंगीत रेषा आणि बीप आवाज थांबला आणि क्षणात हॉस्पिटल साठी ‘पेशंट’ ची ‘बॉडी’ झाली .  . एका श्वासाचं अंतर पार झालं … एक आयुष्य संपलं ….व्हेंटीलेटर बघताना मला तेच दिवस आठवत होते 

नटसम्राट

काल नटसम्राट पाहिला . का कोण जाणे नाटकाइतका नाही आवडला .ही तुलना नाही मनोगत आहे . मूळ नाटकाची अनेक पारायणं केल्यामुळे असेल सिनेमा खूपच फिका वाटतो . स्वगतं , विठोबाची भूमिका,काही प्रसंग  यांना वेळेसाठी कात्री लावली आहे .त्यामुळे त्यांची अगतिकता , मनस्वीपणा, दुःख तितके व्यापक वाटत नाही ,  नानाने भूमिका सुंदर केली आहेच पण त्याची देहबोली , skin tone  त्याच्या म्हातारपणाला suit होत नाही closeups मधे.

काळाचा अनेकदा घोळ वाटतो. छोटे तपशील सुटल्यासारखे वाटतात. सिनेमात दारू चं प्रस्थ खूप दाखवलं आहे जे मूळ नाटकात नाही .अर्थात सर्व वाईटच आहे असं नाही . नाटकाचं शिवधनुष्य पेलण्याचं अवघड काम खूप छान केलं आहे .

एक वेगळा अनुभव आहे हे नक्की.

पाउस

संथ पाउस पडतो
झाडे,कौले भिजवीत
जणू स्वप्न उतरते
जडावल्या पापणीत….
झाडे चिंब शहारली
पक्षी मिटत पंखात
शांत दुपार पेंगते
थेंब थेंब न्याहळत…
ओल्या लाल कौलांवर
मंद पावसाचा सूर
हिरव्या कंच शेतावर
संथ थेंबांचा पदर…
ओला वास रानीवनी
ढग पाण्यात वाहात
भोवताल सारे स्तब्ध

थेंब एकटे गातात….

..4361061

चार-ओळी

तुला विसरुन जाणं ,मला वाटलं तितकं सोपं नव्हतं
कोसळणारया धारांना, असं थोडंच रोखता येतं
*********************************
माझ्या गाण्यात तुच असतोस
सुर आणि ताल होवुन
,माझ्या श्वासात उमलत असतोस
एक नवा श्वास होवुन
**********************************
आठवण तुला माझी आता
खरच का रे येत नाही
कोसळणारया धारां मधे
माझं असणं जाणवत नाही?
********************************
सान्गेन तुला म्हणते पण
सान्गायच राहुन जातं
आभाळ भरुन येतं
पणबरसण्याचं राहुन जातं*
************************************
तुझ्याबद्दल खरच माझी
काही सुध्दा तक्रार नाही
स्वत:विषयी मात्र मला
आता विश्वास उरला नाही
************************************

पाऊस

आज पहाटे लाजत मुरकत , बरसून गेला पाउस नवथर
तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर
मातीवरती हलकी नक्षी ,पानांवरती रंग ओलसर
मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन ,टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली
मेघ अजूनही विस्कटलेले ,चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी

ती गेली तेव्हा…

आई जाऊन एक वर्ष झालं.जखमेवरची खपली निघावी तसं काहीसं वाटत होतं सतत. तसं पाहिलं तर अखेरचे काही महिने तिचं अस्तित्व फक्त “असणं” इतकाच होतं. डोळे ,कान केव्हाच काम करायचे थांबले होते. आणि स्मरणशक्ती- तिने ही काढता पाय घेतला होता.
या सार्‍यात ती तिच्या मनातले काहीच सांगू शकली नाही. कधी कधी वाटतं, कसं वाटलं असेल हळु हळु असं अंधार गुहेत जाताना? आठवणीची एक एक पाकळी मिटताना? या जगापासून दूर खेचलं जात असताना तिच्या मनाने, शरिराने किती आकांत केला असेल! वाईट वाटतं की किती प्रयत्न केला तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहचतच नव्हतो. मधे एक अदृश्य पोलादी पडदा असावा तसं होतं. डोळ्यादेखत ती दूर जात होती आणि आम्ही पुन्हा पुन्हा हाका देण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. मुठीतुन निसटणारे वाळूचे कण पकडण्यासाठी एक वेडी लढाई चालू होती.. एका वेड्या आशेवर की पुन्हा आठवणी जाग्या होतील.. आई आम्हाला ओळखेल..बोलेल.. पण पाटी पुसावी तशा एक एक गोष्टी पुसट होत जात होत्या. रीवाईंड व्हाव्या तशा. आधी जुजबी ओळखी विसरत गेल्या.. मग नातेवाईक.. मग आम्ही.. शेवटी तर तिचं बालपण आठवत असाव. असं वाटत होतं तिच्या तुटक बोलण्यावरून. पण तरी कधीच ना त्रागा ना कुणाला त्रास. माणसाचा स्वभाव इतका ही बदलत नाही? ना बोलता शांतपणे ती या काळोखाच्या सोबतीत ही सहजतेने जात राहीली.
तिच्यासाठी आम्ही सारे होतो पण बिन नावाचे, बिन चेहरयाचे .. सगळे सारखेच. .आपल्या माणसापर्यंत आपण पोहचूच शकत नाही ही जाणीव खूप वेदना दायक असते हे तेव्हा जाणवलं. ती जर जन्मदाती आई असेल तर आपली हतबलता , व्यरथ ठरणारा आटापिटा काळ्जाला घरं पाडीत जातो.
या मॅदर्स डे ला वर्तमान पत्र, ईतरांचे संदेश वाचून खूप जाणवलं की आता माझी आई या जगात नाही. आज मी देखील एक आई आहे पण तरीही हे माझं पॉरकेपण जाणवत रहातं. काहीही न बोलता , शांतपणे देवघरातल्या समई सारखी तेवत राहणारी आई नक्कीच कुठून तरी माझ्याकडे, आम्हा सर्वांकडे त्याच मायेने बघत असेल नाही का?