पाऊस

आज पहाटे लाजत मुरकत , बरसून गेला पाउस नवथर
तहानलेल्या धरतीला या स्पर्शून गेली एक खुळी सर
मातीवरती हलकी नक्षी ,पानांवरती रंग ओलसर
मिटलेल्या पंखात अजूनही नाजूक ओली हळवी थरथर
पागोळ्यांचे पैंजण छुन छुन ,टपटपणार्या ओल्या वेली
हिरवाईची खूण जागवीत पाऊस येई सोनपावली
मेघ अजूनही विस्कटलेले ,चंद्रकोर ही ओली अजुनी
अन्कुरातले स्वप्न फुलविते हसरी गंधित मोहक अवनी

ती गेली तेव्हा…

आई जाऊन एक वर्ष झालं.जखमेवरची खपली निघावी तसं काहीसं वाटत होतं सतत. तसं पाहिलं तर अखेरचे काही महिने तिचं अस्तित्व फक्त “असणं” इतकाच होतं. डोळे ,कान केव्हाच काम करायचे थांबले होते. आणि स्मरणशक्ती- तिने ही काढता पाय घेतला होता.
या सार्‍यात ती तिच्या मनातले काहीच सांगू शकली नाही. कधी कधी वाटतं, कसं वाटलं असेल हळु हळु असं अंधार गुहेत जाताना? आठवणीची एक एक पाकळी मिटताना? या जगापासून दूर खेचलं जात असताना तिच्या मनाने, शरिराने किती आकांत केला असेल! वाईट वाटतं की किती प्रयत्न केला तरी आम्ही तिच्यापर्यंत पोहचतच नव्हतो. मधे एक अदृश्य पोलादी पडदा असावा तसं होतं. डोळ्यादेखत ती दूर जात होती आणि आम्ही पुन्हा पुन्हा हाका देण्याशिवाय काही करू शकत नव्हतो. मुठीतुन निसटणारे वाळूचे कण पकडण्यासाठी एक वेडी लढाई चालू होती.. एका वेड्या आशेवर की पुन्हा आठवणी जाग्या होतील.. आई आम्हाला ओळखेल..बोलेल.. पण पाटी पुसावी तशा एक एक गोष्टी पुसट होत जात होत्या. रीवाईंड व्हाव्या तशा. आधी जुजबी ओळखी विसरत गेल्या.. मग नातेवाईक.. मग आम्ही.. शेवटी तर तिचं बालपण आठवत असाव. असं वाटत होतं तिच्या तुटक बोलण्यावरून. पण तरी कधीच ना त्रागा ना कुणाला त्रास. माणसाचा स्वभाव इतका ही बदलत नाही? ना बोलता शांतपणे ती या काळोखाच्या सोबतीत ही सहजतेने जात राहीली.
तिच्यासाठी आम्ही सारे होतो पण बिन नावाचे, बिन चेहरयाचे .. सगळे सारखेच. .आपल्या माणसापर्यंत आपण पोहचूच शकत नाही ही जाणीव खूप वेदना दायक असते हे तेव्हा जाणवलं. ती जर जन्मदाती आई असेल तर आपली हतबलता , व्यरथ ठरणारा आटापिटा काळ्जाला घरं पाडीत जातो.
या मॅदर्स डे ला वर्तमान पत्र, ईतरांचे संदेश वाचून खूप जाणवलं की आता माझी आई या जगात नाही. आज मी देखील एक आई आहे पण तरीही हे माझं पॉरकेपण जाणवत रहातं. काहीही न बोलता , शांतपणे देवघरातल्या समई सारखी तेवत राहणारी आई नक्कीच कुठून तरी माझ्याकडे, आम्हा सर्वांकडे त्याच मायेने बघत असेल नाही का?

कुणीतरी

कसे लागले वेड जीवाला
कुठुन जुळले रेशीमधागे
चांदरातीला चांदण्यांसवे
कोण कुणासाठी हे जागे?
               कुठुन येइ असा अचानक
              प्राजक्ताचा गंध सभोवती
              कुणासाठी अन हसता हसता
               नकळत डोळे भरुन येती?
कुणासाठी ही लागे हुरहुर
कशासाठी ये भरुन हा उर
कुणासाठी अन आनंदाच्या
क्षणीही उठते मनात काहुर
                कोण आठवे फुल पाहता
              कोण आठवे सुर लावता
             भास कुणाचे होती आणिक
               वाटेवरुनी जाता जाता
कसे,कुठे हे प्रश्ण निरर्थक
कोण कुणा देणारे उत्तर
तरी खरे की नाव कुणाचे
आठवता मन होइ कातर…

रात

वृत- भुजंगप्रयात
मात्रा- लगागा लगागा लगागा लगागा

नभी चांदण्याची जुनी साथ होती
उशाला कधीची उभी रात होती
जळे जीव कोणी उदासीत येथे
पुकारीत कोणा निशा गात होती
कुणाला कसा सांग आता विसावा
उसासून दु:खे हळू गात होती
मला भासले अंत ना या क्षणाला
पहाटेस ही रोजची रीत होती
कुठे अंत आता अशी रात ओली
पिवोनी उजेडास जागीत होती
क्षणामागुती धावती जीव सारे
इथे शेवटाची सुरुवात होती

प्रतिबिंब

तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते
वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी
हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते